करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर आहे. या कारखान्यासाठी गोविंदबापू यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळींनी योगदान दिलेले आहे. दिगंबररावजी बागल मामा यांनी त्यांच्या काळात हा कारखाना कर्जमुक्त केला होता. मात्र पुन्हा हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आणि कारखाना बंद पडला. आता माजी आमदार संजयमामा शिंदे हेच त्याला उर्जितावस्थेत आणू शकतात’, असे मत चंद्रकांत सरडे यांनी व्यक्त केले आहे.
वीट येथे माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ पॅनलची प्रचार सभा झाली. सरडे म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्यात मीही संचालक म्हणून काम पाहिले आहे. मात्र माजी आमदार शिंदे यांचे सारखे सक्षम नेतृत्व मिळाले नाही. आतापर्यंत हा कारखाना का व्यवस्थित चालला नाही याचा विचार सभासदांनी करणे आवश्यक आहे. याकडे राजकीय दृष्ट्या न पहाता शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.’
पुढे बोलताना सरडे म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत फक्त विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र कारखाना कसा सुरु करणार याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. फक्त टीकाटिपणी करून हा कारखाना सुरु होणार नाही. त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. माजी आमदार शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते या कारखान्यासाठी मदत मिळवू शकतात. त्यांनी कारखाना विकला असा आरोप करून विरोधक दिशाभूल करत अपप्रचार करत आहेत. आदिनाथ सहकारीच राहणार आणि सहकारी तत्त्वावरच व्यवस्थित सुरु होणार असा विश्वास सरडे यांनी व्यक्त केला आहे.