तुमचा पाठींबा आहे तोपर्यंत ‘ही’ मंडळी एकत्र आली तरी फरक पडत नाही म्हणत माजी आमदार शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र

Former MLA Sanjay Shinde lays foundation stone for railway underpass at Keam

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा मतदारसंघात मला हरणवण्यासाठी ज्याचे कधी एकमेकांबरोबर पटले नाही ते एकत्र आले. मात्र जोपर्यंत तुमचा मला पाठींबा आहे तोपर्यंत त्यांचा डाव यशस्वी होणार नाही. आणि मला त्याचा काही फरकही पडत नाही’, असा विरोधकांना टोला लगावत ‘आपली कामे करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही’, असे म्हणत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले आहे.

केम येथे रेल्वे भुयारी मार्गाचे भूमिपूजन माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, अच्युत पाटील, विष्णू पारखे, मारुती पारखे, उपसरपंच सागर कुरडे, ग्रामपंचायत सदस्य, गोरख पारखे, सुलतान मुलाणी, अण्णासाहेब पवार, शिवसेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘राजकारण बाजूला ठेऊन मी करमाळा मतदारसंघाच्या विकासाला महत्व दिले. दहिगाव उपसासिंचन योजना व विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला यशही आले. माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे विकासात आणि राजकारणात मी कधीही दुटपी भूमिका घेतली नाही. आता जिल्ह्याचे नेतृत्व दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंद नलिकेमुळे बचत होणारे पाणी खालच्या गावांना सोडण्याची मागणी करत आहेत. मात्र खाली त्यांचेच कार्यकर्ते विरोध करून पाईप जळत आहेत. ही दुटपी भूमिका मतदारांच्या लक्षात येणार आहे. मी विकासासाठी कायम प्रयत्न केला आहे, आणि करतही राहणार आहे’, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत ज्याचं कधी एकमेकांबरोबर पटत नव्हतं ते मला हरवण्यासाठी एकत्र झाले. मात्र सर्वसामान्य मतदार माझ्याबरोबर राहिला आणि यापुढेही विकास कामासाठी तुमच्याबरोबर राहणार आहे. तुमचा मला पाठींबा आहे तोपर्यंत मी करमाळा मतदारसंघात काम करत राहणार आहे. नागरिकांना खरं काय आणि खोटं काय हे समजत. मात्र ते उशिरा लक्षात येते. आपल्या कामात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित रहा, असे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *