करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची सोमवारी (ता. १०) करमाळ्यात बैठक होणार आहे. माजी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून यामध्ये निवडणूक लढण्याबाबत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. इच्छुकांना सोमवारपासून (१० मार्च) अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक लढविण्याबाबत सोमवारी शिंदे गटाच्या समर्थकांची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर करमाळा तालुक्यात श्री आदिनाथ कारखान्याची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांचा पराभव झाला होता. दरम्यान काही विरोधकांनी शिंदे ‘करमाळा तालुक्याच्या राजकारणात लक्ष घालणार नाहीत’ अशा चर्चा घडवून आणल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून माजी आमदार शिंदे यांनी वाढवलेला संपर्क पहाता येणाऱ्या काळात ते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सर्व निवडणुका लढवतील असे चित्र आहे.
माजी आमदार शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने करमाळ्याच्या राजकारणात एंट्री केल्यापासून मतदानाचा आलेख वाढलेला दिसत आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी करमाळ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत मताधिक्य वाढलेले आहे. त्यात आता आदिनाथची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असून ते काय निर्णय घेतील हे पहावे लागणार आहे.
२०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून करमाळ्यात ग्रामपंचात, बाजार समिती व मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली होती.त्यात बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली होती. सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या ताब्यात बाजार समिती आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली मात्र त्यात जगताप यांच्यासह आमदार नारायण पाटील व माजी आमदार शिंदे यांनी लक्ष न घालता बागल गटाच्या ताब्यात दिला होता. प्रा. रामदास झोळ यांनी या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले होते. मात्र त्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. या निवडणुकीत अनेक अर्ज अपात्र झाले होते. शिंदे यांच्या विधानसभा काळात जिल्हा परिषद व पंचात समितीची निवडणूक झाली नव्हती. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला होता. मात्र आता आदिनाथच्या निमित्ताने ते काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कायम राजकारणाचा केंद्र बेंदू राहिला आहे. बागल गटाने हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही प्रक्रिया न्यायालयात गेली. दरम्यान बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र आमदार पाटील यांनी हस्तक्षेप करत हा कारखाना भाडेतत्वावर जाण्यापासून रोखला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाटील हेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर आता ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
कारखाना अडचणीत…
आदिनाथ कारखाना हा अडचणीत आहे. या कारखान्यावर सध्या प्रशासक आहे. निवडणुकीनंतर हा कारखाना अडचणीतून बाहेर कसा काढायचा हे आवाहन असणार आहे. त्यात बागल गट व पाटील गट काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.