करमाळा : ‘करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र येऊन भाजप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. त्यांना विजयी करा’, असे आवाहन माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी केले.
करमाळा येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्या कार्यालयात बागल व शिंदे यांची पहिली संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये एकत्र आल्याची घोषणा करत ‘कमळ’ व ‘घड्याळ’ चिन्ह असलेल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने करमाळ्यात युती निश्चित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादीकडून समान प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेचे आयोजनही करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्टार प्रचारकांच्या सभाही येथे होणार आहेत. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास वेगाने करण्यासाठी व कार्यकर्त्यांना प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळावी म्हणून एकत्रितपणे निवडणुकीत उतरले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ही युती केवळ राजकीय समीकरणापुरती मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठीच करण्यात आली असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. भाजप व राष्ट्रवादीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या दैनंदिन समस्या व लोकहिताची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोण काय म्हणाले?
माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून यापूर्वी मी काम केलेले आहे. येथून खूप मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवता येतो. त्यासाठी आपल्या विचाराचे सदस्य विजयी होणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी काम करावे’.
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा बागल म्हणाल्या, ‘विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो आहोत. करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मनात विकासाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. भाजप राष्ट्रवादीची ही युती त्या अपेक्षांना पूर्ण करण्यास सक्षम आहे.’
दिग्विजय बागल म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात पायाभूत सुविधा, शेती विकास, रोजगारनिर्मिती व सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी ही युती करण्यात आली आहे. विकासाभिमुख नेतृत्वाला नागरिक संधी देतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.’
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, दशरथ घाडगे, निळकंठ देशमुख, ॲड. अजित विघ्ने, सुजित बागल, सतीश निळ, उपनगराध्यक्ष अतुल फंड, विनय ननवरे, प्रशांत पाटील, नानासाहेब मोरे, दादासाहेब जाधव, डॉ. विकास वीर, राजेंद्र पवार, तुषार जाधव, विकास रोकडे आदी उपस्थित होते.
