करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भरावाचा काही भाग कोसळलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची आज (सोमवार) सकाळी पहाणी केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटावा म्हणून यापूर्वी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मी निधी दिला. त्यानंतर नवीन पुलासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. याकडे राजकीय मुद्दा न पहाता लोकप्रतिनिधींनी हे काम पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे माजी आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.
ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याकडून पहाणी
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागासाठी महत्वाचा असलेला ब्रिटिशकालीन डिकसळ पूल धोकादायक असल्याचे कारण देत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नुकताच त्याच्या भरावाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर आमदार नारायण पाटील, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनीही या पुलाची पहाणी केली होती. आज माजी आमदार शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे, राजेंद्र धांडे, ऍड. नितिनराजे भोसले, डॉ. गोरख गुळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी आदी उपस्थित होते.
डिकसळ पुलाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी
माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘पश्चिम भागातील दळणवळणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्न केला आहे. ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाला असून त्याला पर्याय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर करून घेतला. त्याचे कामही सुरु झाले आहे. त्याचे काम वेगात होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करत आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष न करता जनहित लक्षात घेऊन काम कसे वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लहान वाहने येतुन सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री गोरे व पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा पूल लवकर होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना आणि आमदार असताना या प्रश्नासाठी निधी दिला. या भागातील शिक्षण आणि आरोग्यचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.