करमाळा (अशोक मुरूमकर) : मांगी तलावातून हाळगाव येथील कृषी महाविद्यालयास पाणी मंजूर करण्यात आले आहे. याला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विरोध केला आहे. या तलावात आधी कुकडीचे पाणी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मांगी तलावातील पाणी हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल यांनी याबाबत चळवळ सुरू केली असून गावांमध्ये त्यांनी जनजागृती सुरू केली आहे. या निर्णयाला माजी आमदार शिंदे यांनीही विरोध केला असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार शिंदे यांनी म्हटले आहे की, मांगी तलावावर पुनवर, वडगाव, मांगी, पोंथरे आदी गावांची शेती अवलंबून आहे. या तलावात नैसर्गिक स्रोताशीवाय पाणी येत नाही. या तलावात कुकडीचे कायमस्वरूपी पाणी यावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी सरकारकडे आमचा पाठपुरावाही सुरू आहे. मात्र ही मागणी पूर्ण झालेली नसताना या तलावातून पाणी आरक्षित करणे चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्याबरोबर राहणार आहोत. ओरफ्लोशिवाय इतर आवर्तन सोडून शेतकऱ्याना दिलासा देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले आहेत.
बागल म्हणाले, ‘मांगी तलावावर आमची शेती अवलंबून आहे. या भागातील शेतकऱ्याच्या जमिनी तलावात गेल्या आहेत. मात्र येथून पाणी जात असताना आमदार नारायण पाटील हे लक्ष देत नाहीत ही दुर्दैवाचीबाब आहे. या तलावतून आम्ही कदापी दुसरीकडे पाणी जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत.’ यावेळी सुजीत बागल, पोथरेचे धनंजय शिंदे, शहाजी झिंजाडे, दादासाहेब जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
