करमाळा (सोलापूर) : म्हैसगाव येथील साखर कारखाना विकणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार नाही, असा आरोप पाटील गटाचे सुनील तळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पॅनल एकमेकांच्या विरोधात आहेत. प्रा. रामदास झोळ यांचाही पॅनल या निवडणुकीत आहे. पण ते किती मते घेतील हे पहावे लागणार आहे. तळेकर म्हणाले, ‘माजी आमदार शिंदे यांना साखर कारखाना चालवता येत नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. म्हैसगाव येथील खाजगी साखर कारखाना त्यांनी विकला आहे. माढा तालुक्यातील ३६ गावातही ऊस क्षेत्र जास्त असताना व शेतकऱ्यांना गरज असताना हा कारखाना ते सक्षमपणे का चालवू शकले नाहीत? असा प्रश्न त्यांनी केला आहे. आता शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील कारखाना सभासद मतदारांना याचे स्पष्टीकरण द्यावे’.