करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातील बहुचर्चीत एसटी बसचा विषय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मांडला आहे. सतत बंद पडणाऱ्या एसटी बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली त्यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पत्रकार अशोक मुरूमकर व पत्रकार जयंत दळवी उपस्थित होते.
करमाळा आगारात असलेल्या एसटी बस जुन्या आहेत. त्यामुळे सतत त्या बंद पडत आहेत. गेल्या वर्षभरापासून पत्रकार विशाल घोलप यांनी समाज माध्यमातून हा विषय मांडला आहे. राजकीय नेते देखील हा विषय मांडत आहेत. मात्र अद्याप एसटी बस मिळालेल्या नाहीत. शेजारील काही आगारात नवीन एसटी बस मिळाल्या आहेत. परंतु करमाळ्यात एकही नवीन गाडी नसल्याने प्रवशांना त्रास सहन करावा लागत आहे.
हा विषय पालकमंत्री गोरे यांच्याकडे चिवटे यांनी मांडला. काल गोरे करमाळा दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी हा विषय मांडला. तेव्हा पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘आता काही ठिकाणी नवीन एसटी बस आल्या आहेत. त्यात करमाळ्यात आल्या नाहीत का? त्यावर चिवटे यांच्यासह पत्रकार मुरूमकर व दळवी यांनी सविस्तर माहिती दिली. तेव्हा या विषयात लक्ष घालून नवीन एसटी बस मिळविण्यासाठी प्रयत्न करतो,’ असे आश्वासन दिले आहे.