करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरासह तालुक्यात आज (बुधवार) गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतीसह मोठ्या मंडळांनी गणरायाची भव्य मिरवणूका काढल्या. बँजो व हलगीच्या तालात निघालेल्या मिरवणुकीत गणेशभक्तांच्या डोक्यावरील पांढरी टोपी व फेटे सर्वांचे लक्ष वेधत होते. शहरातील राशीन पेठ, दत्त पेठ, व्यापारी पेठ, सावंत गल्ली, गंगाराम तालीम, गजराज, गजानन आदी मंडळाच्या मिरवणुकी सायंकाळी निघाल्या. पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत कोणीही डीजे वाजवू नये यावर उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांचे विशेष लक्ष होते.
करमाळा शहरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तेव्हा ग्रामीण भागातील, घरगुती व बाल मंडळाचे गणपती विराजमान झाले. त्यानंतर दिवसभर मेन रोड, राशीन पेठ, दत्त पेठ, भवानी पेठ, वेताळ पेठ, किल्ला विभाग, महाराष्ट्र चौक येथून गणपती घेऊन जाण्याची व सजावटीसाठी साहित्य घेऊन जाण्याची लगबग गणेशभक्तांमध्ये दिसत होती. लहान मंडळांकडून देखील मोठ्या उत्साहात गणरायाची मिरवणूका काढण्यात आल्या.
भक्तीमय वातावरण
गणरायाच्या आगमनामुळे करमाळा शहर व तालुक्यात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. शहरात दिवसभर गणरायाची मूर्ती व सजावटीचे साहित्य घेण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिसली. वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत गणरायाचे ठिकठिकाणी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
जल्लोषपूर्ण वातावरण
लाढक्या गणरायाचे स्वागत जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. अनेक मंडळांनी रथामध्ये वाजत- गाजत श्रींची मिरवणूक काढली. फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली. विद्युत रोषणाई आणि सजवलेल्या मंडपात श्रीचे आगमन झाल्यानंतर या उत्साहाला आनंदाचे उधाण आले होते.
आकडेवारी
– करमाळा तालुक्यात साधारण १३३ मंडळांनी परवानगी घेऊन श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. यामध्ये करमाळा शहरातील २५ मंडळे आहेत. तर १६ गावात एक गाव एक गणपती असल्याचे सांगण्यात आले आहे.
असा आहे बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली ८ अधिकारी, ५५ पोलिस, ६० होमगार्ड व १ आरसीपी पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सव नीरविघ्नपणे पार पडावा म्हणून करमाळा तालुक्यात ४१९ जणांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आल्या आहेत.
डीजेबाबत नोटीसा…
गणेशोत्सवात कोणीही ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त आवाज ठेऊ नये व डीजे वाजवू नये यावर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. परवानगी देतानाच याबाबत संबंधित मंडळाच्या प्रमुखांना नोटीस दिली जात आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले जात आहे.