करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील नेत्यांनी विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम केले आहे. या भुलथापांना बळी न पडता विकासासाठी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी सालसे येथे केले आहे.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे हरिभाऊ मंगवडे, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफुर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, भिमराव ननवरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते यशवंतराव गायकवाड, श्रीकांत साखरे पाटील उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज हे प्रश्नही अध्यापही सुटले नाहीत. विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम सुरु असून तालुक्याचा फक्त कागदावर विकास झाला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग याबाबतही तालुका मागास झाला असून करमाळा तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. गटातटाच्या राजकारणामध्ये करमाळा तालुका विकासापासून वंचित राहिला आहे’, असे ते म्हणाले.
‘शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आपल्या तालुक्याचा विकासही झाला पाहिजे. याकरिता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपला प्रतिनिधी म्हणून निवडणुकीस उभा आहे. लोकप्रतिनिधी नुसता कोट्यावधीचा विकास झाला असे सांगतात मग त्या निधीतून नक्की कोणाचा विकास झाला याचाही जाब आपण मतदार म्हणून विचारला पाहिजे’, असे ते म्हणाले. ‘आदिनाथ, मकाई, कमलाई, भैरवनाथ या कारखान्याची बिले मिळवून देण्याचे काम आपण केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मराठा आरक्षण लढ्यामध्येही आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन मराठा समाजाच्या मुलांना वस्तीगृहभत्ता, शिष्यवृत्ती भत्ता मिळून देण्याचे काम केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळून देण्यासाठी काम केले’, असून या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे.
सभेचे प्रास्ताविक व स्वागत श्रीकांत साखरे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवले यांनी तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले. करमाळा तालुक्यामधील भुमिपुत्र, सुशिक्षित, सुसंस्कृत, विकासाची दृष्टी असलेले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या प्रा. रामदास झोळ हे करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेसाठी उभे असून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी आपल्या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर प्रा. झोळ यांना निवडून द्यावे, असे आवाहन बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केले आहे.