करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जात असलेल्या कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी ४७ लाख निधी खर्च करण्यास राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे कक्ष अधिकारी आर. आर. कुंभार यांनी याबाबत पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले असून त्याचा अहवाल पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आला असून त्याप्रमाणे अहवाल देण्याचे सूचित केले आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार निधी वितरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 1 जुलैला फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली होती.
‘अशी’ असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना
आमदार शिंदे यांच्या संकल्पनेनुसार प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.
टप्पा 1 : रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
टप्पा 2 : या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 1800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत .सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.