करमाळा (अशोक मुरूमकर) : ओंकार शुगरने परिपत्रकाद्वारे ऊस दर जाहीर केले आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून इतर कारखाने किती दर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस बाबुराव बोत्रे पाटील यांच्या म्हैसगाव, हिरडगाव, चांदपुरी व घोगरगाव येथील कारखान्यांना ऊस गाळपासाठी जात आहे.
या कारखान्याने जाहीर केलेल्या दरामध्ये इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कारखान्याचा सर्वाधिक ऊस दर आहे. या कारखान्याने प्रती टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याचे जाहीर केले असून पहिला हप्ता ३ हजार २५० रुपये प्रमाणे दिला जाणार आहे. याशिवाय म्हैसगाव येथील कारखान्याने ३ हजार १५० रुपये दर जाहीर केला असून पहिला हप्ता ३ हजार ५० रुपये दिला जाणार आहे. हिरडगाव येथील कारखान्याने ३ हजार २०० रुपये दर जाहीर केला असून पहिला हप्ता ३ हजार १०० रुपये दिला जाणार आहे. याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
