करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत दिंड्यांच्या माध्यमातून पंढरीला जात आहेत. त्यातच नगर जिल्ह्यातून एक आगळीवेगळी दिंडी पंढरीला निघाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची ही दिंडी असून नगर जिल्ह्यातून ही दिंडी आली आहे. या दिंडीचे हे सातवे वर्ष आहे. एकनाथराव धांडे यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी मार्गस्थ झाली आहे.
बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशी आहे. त्यात पंढरपूरच्या वेशीवर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर विठुरायचा जयघोष करत वारकरी दिसत आहेत. मुक्काम दर मुक्काम करून मोठ्या भक्ती भावाने पायी चालत हे वारकरी आलेले आहेत. चालत आलेले असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या उत्साह दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने काढलेल्या ‘ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून यामध्ये साधणार ८० ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. दिंडीमध्ये त्यांनी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यावर जनजागृती केली जात आहे. या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत होत असून आज (शनिवारी) करमाळा येथे या दिंडीचे स्वागत झाले. भगवा पताका खांद्यावर घेऊन या दिंडीत ग्रामसेवक वारकरी म्हणून सहभागी झाले आहेत. डोक्यावरील टोपी त्यांचे लक्ष वेधत आहे.