करमाळा (अशोक मुरूमकर) : कोर्टी गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या नावाला आमदार नारायण पाटील यांनी ग्रीन सिग्नल दाखवला आहे. मोहिते पाटील यांच्याकडून ही अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. ‘आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मूल्यमापन करूनच उमेदवारी दिली जाईल. कोणाचे काम चांगले आहे आणि कोणाला उमेदवारी द्याईची याचा निर्णय शिष्ठमंडळ घेईल. मात्र एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. आपल्याला नागरिकांची सेवा करायची आहे,’ असे आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.
जेऊर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाचा मेळावा झाला. यावेळी पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ‘तालुक्यातील आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याचे नुकसान केले. सहा महिन्यापूर्वी आमच्याकडे आदिनाथ दिला आहे. तालुक्यात रिटेवाडी उपसासिंचन योजना सुरु करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांची कामे करायची आहेत. नागरिकांना योजना कशा मिळतील यावर भर देईचा आहे. त्यामुळे काम करणाऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे.’
सुरुवातीला इच्छुक उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी फिसरे गणासाठी शंभूराजे फरतडे यांनी उमेदवारी मागितली. केत्तूर येथील नानासाहेब पवार म्हणाले, ‘तुम्ही सांगाल त्याचे काम करू’. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. हरिदास केवारे यांनी ऍड. राहुल सावंत यांच्या पत्नीला पांडे गटातून तर वीट गटातून राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्या पत्नीला उमेदवारी मागितली. गौडरे येथील बापू नीळ यांनी वीट गटातून उमेदवारी मागितली. त्यांनी गेल्यावेळी अर्ज मागे घेतला होता. सुरेश शिंदे यांनी वीट गट किंवा हिसरे गण यासाठी मुलीला उमेदवारी मागितली. ज्योतीराम लावंड यांनी हिसरे गणासाठी उमेदवारी मागितली. दत्ता जगदाळे यांनीही या गणासाठी उमेदवारी मागितली आहे. विशाल तकिक यांनी दत्तात्रय रणशिंग यांच्यासाठी वांगी गटातुन उमेदवारी मागितली.
डॉ. भगवंत बंडगर म्हणाले, ‘उमेदवारी मिळेल त्याचे काम करू’, बप्पा अतकरे यांनी हिसरे गणासाठी पानसरे यांना उमेदवारी मागितली. कोर्टी गणातून महेंद्र एकाड यांना तुकाराम मचाले यांनी उमेदवारी मागितली. राहुल जाधव यांनी वांगी २ येथे उमेदवारी मागितली. ‘आपल्या हक्काचा चिखलठाण गट कोणालाही देऊ नका’, असे कुगाव येथील सागर पोरे यांनी सूचित केले. कामोणे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नलवडे यांनी राष्ट्रवादीचे संतोष वारे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या राणी वारे यांना पांडे गटातून उमेदवारी मागितली. डॉ. नेटके यांनी वीट गटासाठी उमेदवारी मागितली.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल यांनी विधानसभा निवडणुकीत पाटील गटाबरोबर असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत यांना उमेदवारी देताना विचारात घ्यावे लागणार आहे. मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनाही काम करण्याची संधी द्यावे’, असे आवाहन केले. प्रा. संजय चौधरी यांनी चिखलठाण गटातील काही प्रमुख नेत्यांच्या भूमिकांबाबत मत मांडले. सावंत गटाचे सुनील सावंत, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आदींची भाषणे झाली.
