करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे येतील की नाही याबाबत प्रश्न केला जात असतानाच श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी त्यांची जोरदार इंट्री झाली. विवाहस्थळी स्वागत झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेथून चिवटे हॉटेल येथे जेवण झाल्यानंतर अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी स्वतंत्र संवादही साधला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार संजयमामा शिंदे (विवाहस्थळी), भाजपचे चेतनसिंह केदार सावंत, गणेश चिवटे, जगदीश अगरवाल, शिवसेनेचे (शिंदे गट) महेश चिवटे व मंगेश चिवटे उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे हे करमाळा दौऱ्यावर येत आहेत, याची माहिती आधीच होती. त्यामुळे प्रशासन सज्ज होते. मात्र यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उतरलेल्या हेलिकॅप्टरमध्ये पालकमंत्री गोरे हे आले नाहीत. त्यात माजी खासदार निंबाळकर होते. त्यामुळे पालकमंत्री येणार नाहीत अशी शक्यता निर्माण करत चर्चा सुरु असतानाच सायंकाळी ८.२० वाजता त्यांचे ताफ्यात आगमन झाले. सर्वांशी सवांद अधिकाऱ्यांशी सवांद, संघटनांशी संवाद झाल्यानंतर महेश चिवटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन रात्री १०.३२ वाजता पुण्याकडे ‘बाय कार’नेच रवाना झाले.
पालकमंत्री गोरे यांचा हा करमाळ्यातील पहिलाच शासकीय दौरा होता. करमाळ्यासह पंढरपूर, माढा, नांदेड येथून काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी सर्वांशी साधला. नांदेड येथील कार्यकत्यांनी त्यांचा खारीक खोबऱ्याचा हार गळ्यात घालून सत्कार केला. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याशी त्यांनी बंद दाराआड चर्चा केली.
सर्वांशी सवांद झाल्यानंतर चिवटे हॉटेल येथून बाहेर पडत असताना गाडीजवळ चर्चा करत असताना पुन्हा गणेश चिवटे यांना बोलवत गणेशराव खुशना? असे पालकमंत्री गोरे म्हणाले. चिवटे यांनी करमाळ्यात सामुदायिक विवाह सोहळा सुरु केल्याचे हे तिसरे वर्ष आहे. वर्षभर ते शिक्षणासाठी करमाळ्यात बाहेर गावातून आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत भाजी भात पुरवतात. निराधारांना रोज मोफत जेवण देतात. त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक ठिकाणी दखल घेतली गेली आहे. रविवारी (ता. १६) झालेल्या विवाह सोहळ्याला पालकमंत्री आले होते. त्यामुळे हा विवाह सोहळा आधीकच चर्चेत आला. त्यात जाता- जाता चिवटे यांचा उल्लेख करत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.