करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवारी (ता. १६) भाजपचे नेते गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखालील श्रीराम प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या भेटीनंतर ते श्रीराम प्रतिष्ठान संचलित क्रीडा संकुल आधुनिक व्यायाम शाळेला भेट देणार आहेत.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर करमाळ्यात मंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या निवडणुकीत चिवटे यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर निकाल होताच त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गोरे यांच्याकडे गेले. चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या करमाळ्यातील सामुदायिक विवाह सोहळ्यास ते हजेरी लावत आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व असणार आहे.
पालकमंत्री गोरे हे दुपारी साडेचार वाजता नातेपुते येथून हेलिकॅप्टरने करमाळ्यात येणार आहेत. करमाळ्यातील हेलिपॅडवरून ते बाय कार देवीचामाळ रोडवर होत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला येणार आहेत. तेथून सायंकाळी साडेसहा शासकीय वाहनाने ते पुण्याला जाणार आहेत.