करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘एकनाथ आरोग्य हीरक वर्षा’निमित्त व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवारी (ता. 7 मार्च) करमाळ्यात आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी 30 ते 40 तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच मोफत चष्म्याची वाटप केले जाणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. ओंकार उघडे पाटील व सचिव दीपक पाटणे यांनी दिली आहे.
या आरोग्य शिबिरात कॅन्सर रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. मोफत डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय मुंबई येथील त्वचारोग तज्ञ येथे येणार आहेत. हृदयविकार, डायबिटीस, गुडघेदुखी, सांधेदुखी अशा आजारांची सुद्धा यावेळी तपासणी करून औषधे दिली जाणार आहेत. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, माजी उपनगराध्यक्ष ऍड. कमलाकर वीर, बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, भाजपचे जिल्हा चिटणीस गणेश चिवटे, प्रा. रामदास झोळ, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदी उपस्थित राहणार आहेत