करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीच्या महापुरामुळे घरात पाणी जाऊन बाधित झालेल्या नागरिकांना आज (रविवार) भांड्याचा संच व उपलब्ध गृहउपयोगी वस्तू देण्यात आल्या. करमाळा तहसील कार्यालय येथे प्रातिनिधिक स्वरूपात संबंधित गावचे पोलिस पाटील यांच्याकडे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या. गरजू व्यक्तीपर्यंत या वस्तू पोहोच करण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे खडकी, तरटगाव, आळजापूर, बिटरगाव श्री, मिरगव्हाण, बाळेवाडी, पोटेगाव, करंजे, निलज, पोथरे, आवाटी व बोरगाव येथील अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काही भागाची पाहणी देखील केली होती. यामध्ये नुकसान झालेल्या नागरीकांचे पंचनामे करून तत्काळ मदत म्हणून १० हजार रुपये संबंधिताच्या बँक खात्यात सरकारकडून देण्यात आले आहेत. याबरोबर किराणा कीट ही अनेक संस्था व व्यक्तींकडून देण्यात आले आहे. स्वस्तधान्य दुकानातून सरकारच्या वतीने धान्यही देण्यात आले आहे. कोणताही नागरिक यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे.
करमाळा तहसील कार्यालयामार्फत सर्वांना समान मदत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत मिळावी म्हणून पंचनामे केले जात आहेत. बाधित नागरिकांना भांडी संच, ब्लॅंकेट, किराणा कीट, बकेट, चादर, ट्युथ पेस्ट, ब्रश साहित्य देण्यात आले आहे. महसुलाचे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रघून चव्हाण, आदर्श शिक्षक संतोष पोतदार, प्रभारी केंद्रप्रमुख निशांत खारगे, पुरवठा निरीक्षक दिव्यश्री ढोबळे, शब्बीर मुलाणी, सूरज कानगुडे, राहुल वाघमारे, बंकट साबळे, पोथरेचे पोलिस पाटील संदीप पाटील, पोटेगावचे श्री. शिरगिरे, भूषण अभिमन्यू, प्रवीण घोडके, विश्वभर रोडे, प्रा. ठोसरे, करंजेच्या पोलिस पाटील सारिका ठोसर, निलजच्या पोलिस पाटील चित्रा राऊत, बाळेवाडीच्या यशोदा पाटील, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.