करमाळा (अशोक मुरूमकर) : शौचालयावरून घरी जात असलेल्या एका वृद्धाचा मागे येत असलेल्या पीकअपची धडक बसून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची घटना नर्ले येथे घडली आहे. राजाराम केरू गोफणे (वय 81, रा. नर्ले, ता. करमाळा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. यामध्ये निष्काळजीपणे पिकअप मागे घेतल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ प्रल्हाद नाडकर (रा. लोणी, ता. माढा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. बिरुदेव राजाराम गोफणे (वय 30, व्यवसाय पुणे येथे खासगी नोकरी) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.
मृत्यू झालेल्या गोफणे यांचा मुलगा बिरुदेव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘7 जुलैला सकाळी वडील राजाराम हे शौचालयावरून घरासमोर आले होते. तेव्हा गुन्हा दाखल झालेला पीकअप चालक नाडकर याने निष्काळजीपणे वाहन मागे घेतले. त्यात गोफणे हे गंभीर जखमी झाले. बहीण छबा बबन वायकुळे यांनी मला याची माहिती दिली. त्यानंतर मी पुणे येथून नर्ले येथे येण्याची तयारी करत होतो. दरम्यान काही वेळातच पुनः बहिणीने फोन करून सांगितले की, वडिलांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.’