करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रभाग चारमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. येथे विविध विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय असतो. यामुळे या प्रभागातून माझा विजय निश्चित असून संधी मिळणे आवश्यक आहे, असे युवा सेनेचे जिल्हाउपप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत राखुंडे यांनी या प्रभागातून नगरपालिकेची गेल्या वेळेस निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांना 330 मते मिळाली होती. विजयी उमेदवाराला 540 मते मिळाली होती. 210 मतांनी चंद्रकांत राखुंडे यांचा पराभव झाला होता. राखुंडे यांनी या प्रभागात आता कामे केली असून सर्वसामान्यांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली असून अनेक रुग्णांवर मोफत ऑपरेशन केले आहेत. या प्रभागातील 70 महिलांना बांधकाम कामगाराचा लाभ मिळवून दिला आहे. या प्रभागातील नागरिकांचे पोलिस स्टेशन तहसील कार्यालय आदी शासकीय कार्यालयातील प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे.
सध्या राखुंडे हे प्रभाग चारमधील प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत. या प्रभागातील नागरिकांना घेऊन माजी आमदार जगताप यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याचे राखुंडे यांनी सांगितले आहे.
