करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. याकडे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सीना नदीच्या काटावर बिटरगाव श्री हे गाव आहे. सीना नदीत वाळू उपशाला बंदी आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठ्याप्रमाणात वाळू उपसा होत आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. मात्र नदीला पाणी आलेले नाही. त्यामुळे नदीतून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. काही ठिकाणी वाळूचे स्टॊक देखील करण्यात आले, असल्याची तक्रार केली जात आहे. घरकुलाच्या नावाखाली वाळू काढून विकली जात असल्याची तक्रार केली जात आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. पाऊस पडल्याने शेतात व घरासमोर मुरूम टाकायला परवानगी दिली जात नाही मात्र बेकायदा वाळू उपसा होत असताना तहसीलदार ठोकडे या दुर्लक्ष करत आहेत का? हा प्रश्न केला जात आहे.