करमाळा (सोलापूर) : माळशिरस, माढा व करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदचे गट व पंचायत समितीची निवडणुक शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढणार असून इच्छुकांच्या मुलाखती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार संजय कदम हे घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
चिवटे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलनागरिकांमध्ये सहानुभूती आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी केलेले सामाजिक काम व सर्वसामान्यांना केलेली मदत इतर पक्षांपेक्षा मोठी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. युती- आघाडी करण्याचे अधिकार आमदार कदम यांना देण्यात आले आहेत. चिवटे म्हणाले, ‘राज्यात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आहे. शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळाला तर महायुतीतून सुद्धा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची तयारी आहे.’
