अशोक मुरूमकर : पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्व गटाचे व पक्षाचे नेते एकत्र येतात. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केली तरी सर्व मतभेद बाजूला ठेऊन या कट्ट्यावर एकत्र येतात आणि आपापली मते मांडतात. तसेच चित्र करमाळ्यातही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनुभवायला आले. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि करमाळ्याची वैचारिक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही संस्कृती कायम ठेवण्याची गरज आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत झाली. महायुतीत आमदार संजयमामा शिंदे, बागल गट, शंभूराजे जगताप यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश चिवटे, भाजपचे गणेश चिवटे व आरपीआय, रासप हे प्रमुख होते. तर महाविकास आघाडीत माजी आमदार नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सावंत गट, संतोष वारे, बारामती ऍग्रोचे सुभाष गुळवे, डॉ. अमोल घाडगे यांच्यासह शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती. प्रा. रामदास झोळ यांनीही यामध्ये काम केले होते.

निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिते पाटील समर्थक डॉ. घाडगे, अमरजित साळुंखे, राजेश पवार आदी महाविकास आघाडीची बाजू मांडत होते. तर आमदार शिंदे यांचे समर्थक ऍड. अजित विघ्ने, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, विनय महानवर हे भक्कमपणे बाजू मांडत होते. राजकीय विश्लेषक व जाणकार युवा पत्रकार विशाल घोलप हे ‘करमाळा समाजकारण’ या ग्रुपवर व्यक्त होत होते. निवडणुकीत अतिशय टोकाची भूमिका मांडली जात होती. मात्र निकाल झाल्यानंतर या ग्रुपवरील सर्व सदस्य राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले होते.

ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांच्या पुढाकारातून ही वैचारिक मंडळी एकत्र आली. डॉ. अमोल घाडगे यांनी ही मंडळी एकत्र आणली. ऍड. विघ्ने हे उपस्थित राहू शकले नव्हते. करमाळ्याच्या या वैचारीक मंडळींबरोबर आपण राजकीय मतभेद बाजूला ठेऊन बरोबर असल्याचे सांगितले होते. करमाळ्याच्या संस्कृतीमध्ये भर टाकणारा हा क्षण पुढेही टिकवणे गरजेचे आहे. हॉटेल विराज येथे १२ जूनला एकत्र येऊन स्नेह भोजन घेण्यात आले होते. राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. मात्र तो राग मनात धरून वाद झाल्याची उदाहरणे आहेत. त्याला करमाळकरांनी एकत्र येत वेगळा आदर्श घालून दिला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *