करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गोविंदपर्व’च्या कर्ज प्रकरणात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने करमाळा न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत प्रा. रामदास झोळ हे देखील प्रतिवादी आहेत. ते कारखान्याचे संचालक असल्याचा यामध्ये उल्लेख आहे. अशा दोन फिर्यादी असून त्याची सुनावणी २६ व २७ सप्टेंबरला होणार आहे.
राजुरी येथील गोविंदपर्व कारखाना बंद अवस्थेत आहे. या कारखान्यामध्ये प्रा. झोळ हे संचालक आहेत. २०१० मध्ये हा कारखाना स्थापन झाला होता. त्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज पुरवठा केला होता. मात्र बँकेचे कर्ज वेळेत गेले नाही. बँकेकडे देण्यात आलेले चेकही जमा झाले नाहीत. त्यामुळे चेक दिलेल्या व्यक्तीसह नऊ संचालकांवर बँकेने २०१४ मध्ये करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. २६ व २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या ‘गोविंदपर्व’बाबत आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा करत ‘थकीत ऊस बिलाचा आणि प्रा. रामदास झोळ यांचा काहीही संबंध नाही. पत्रकार परिषदेत कारखाना आणि प्रा. झोळ यांचा संबंध नाही असे म्हटले होते. मात्र करमाळा न्यायालयात दाखल असलेल्या फिर्यादीत त्याचा संचालक म्हणून उल्लेख असल्याने करमाळा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. या कारखान्याकडे शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत. मात्र ते राहिलेले पैसे दिले जातील, असे जगताप यांनी सांगितले आहे. परंतु शेतकऱ्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पोलखोल भाग ६ : प्रा. झोळ यांच्या विनंतीवरूनच ‘गोविंद पर्व’ला ऊस! थकीत बिलासाठी आंदोलन करण्याचा शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे इशारा
मकाई, आदिनाथ, विहाळ व कमलाई या कारखान्याविरुद्ध प्रा. झोळ यांनी शेतकऱ्यांच्या पैशासाठी आंदोलने केली. मात्र गोविंदपर्व कारखान्याकडेही शेतकऱ्यांचे थकीत देणे असताना त्याचा साधा कधी उल्लेखही त्यांनी केला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात शंका उपस्थित केली जात आहे. (प्रा. झोळ यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्यांचे संपूर्ण म्हणणे ‘काय सांगता’ प्रसिद्ध करणार आहे. मात्र ते कधी भूमिका मांडणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष आहे.) क्रमशः