करमाळा (अशोक मुरूमकर) : ’80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण’ या भूमिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई येथील दसरा मेळाव्याला न जाता सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात पूरग्रस्तांच्या बांधावर जाऊन दसरा साजरा केला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉलवरून उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, अभिनेते सयाजीराजे शिंदे, युवा सेना महाराष्ट्र प्रमुख बाजीराव सिंघम यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
करमाळा तालुक्यात सीना नदीला १५ दिवसात तीन वेळा महापूर आला. त्यामुळे शेतीचे व घरांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शिवसेनेकडून मदत दिली जात आहे. गावागावात जाऊन किराणा कीट, ब्लॅंकेट वाटप केले जात आहे. पुरामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना त्यांनी जेवणही देण्याचे काम केले. नागरिकांना आणखी मदत देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे.