करमाळा (अशोक मुरूमकर) : शेतात राबणाऱ्या व नव- नवीन प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शेतकरी दांपत्यांचा शेटफळ येथे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते सन्मान झाला. निमित्त होते लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकरी मेळाव्याचे! उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या उपस्थितीत हे सन्मान झाले. तालुक्यात उत्कृष्ट शेती करणाऱ्या प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी दांपत्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
नागराज मशिनरी शेती मॉल व लोकविकास फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या सुषमा चव्हाण यांना व त्यांचे पती संतोष चव्हाण या दांपत्यासह अश्विनी गोडगे व श्रीकृष्ण गोडगे, जयश्री दुरंदे व मल्हारी दुरंदे, अर्चना देवकर व रविंद्र देवकर, नगीना पोळ व ब्रम्हदेव पोळ, मनिषा कदम व संतोष कदम, छाया बिचितकर व रामदास बिचितकर, मनिषा अडसूळ व भारत आडसुळ, रूपाली मोरे व राहूल मोरे, उज्ज्वला रोकडे व बापूराव रोकडे या शेतकरी दांपत्यांचा यावेळी सन्मान झाला. याशिवाय मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांचाही ‘लोकविकास कृषी गौरव’ पुरस्कार देण्यात आला.
कृषी अधिकारी वाकडे म्हणाले, ‘शेतीमध्ये प्रगती साधण्यासाठी अनेक अडचणीवर मात करून यशस्वी झालेल्या अनुभवी शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. शेती परवडत नाही असे बोलले जाते मात्र अनेक शेतकऱ्यांनी फायद्यात करून दाखवलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर शेती फायदेशीर होते. यासाठी शेती क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे वैभव पोळ यांनी केले. आयपीएस अंजना कृष्णा यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश पाटील, ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकिशोर वलटे यांनी केले. आभार जानवी पोळ यांनी मानले. आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, अमर अडसूळ, सुप्रिया शेलार, कैलास लबडे, किरण पोळ, मुरलीधर पोळ, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
