अशोक मुरूमकर : करमाळा आगारात एसटी बसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. एसटीत बसल्यानंतर वेळेत पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू का नाही याची खात्री प्रवाशाला नाही. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये हा विषय मांडला जातो आहे, हे तुम्ही पाहिले असेलच की? मग तुम्ही सरकारला चुकीची माहिती का देता? की मग संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात चुकीची माहिती सांगितली? याची चर्चा सुरु आहे.
एसटीचे ‘ब्रेकडाऊन’ हे फक्त करमाळा आगारातच जास्त होते आहे असे नाही. अनेकदा दुसऱ्या आगाराच्याही एसटी बंद पडत आहेत हे वास्तव आपण इतरत्र प्रवास करताना पहातो आहोत किंवा समाज माध्यमात तसे फोटोही येत आहेत. मात्र प्रश्न असा आहे की करमाळा आगाराची अनेकदा गाडी गेटच्या आतही बंद पडल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवाशांनी ढकलून एसटी सुरु केल्याचे प्रवासी सांगतात, असे चित्र असूनही वास्तव सरकार समोर येत नसेल तर याला काय म्हणायचे? वरिष्ठांना खुश करण्यासाठी तर तुम्ही खरी माहिती लपवली नाही ना? असा प्रश्न आता केला जाऊ लागला आहे. दिवसात किती गाड्या कोणत्या कारणाने बंद पडल्या याची नोंद आपल्याकडे असेलच की? नोंद नसले तर समाज माध्यमात येत आहे ते? प्रवासी सांगत आहेत ते मग खोटं म्हणायचे का सरकारनेही अशा अधिकाऱ्याची चौकशी करणे आवश्यक आहे अशी मागणी केली जात आहे.
करमाळा आगाराचे आगारप्रमुख म्हणून होनराव यांनी पदभार घेतला तेव्हापासून तक्रारी वाढल्या आहेत. ते कर्मचाऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना ऐकत नाहीत असा आरोप केला जात आहे. ते अतिशय मनमानीपणे कारभार करतात त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो आहे, असे बोलले जात आहे. यावर होनराव साहेब तुमच्याच कारभारामुळे शिक्कामोर्तब झाले असे म्हणण्यास वाव आहे.
करमाळा आगार हे महत्वाचे एसटी स्टॅन्ड आहे. येथून पुणे, मुंबई, पंढरपूरला अनेक प्रवासी जातात. करमाळा तालुक्यात असलेल्या खेड्यापाड्यातील प्रवाशांचा या एसटीवर प्रचंड विश्वास आहे. ‘वाट पाहीन पण एसटीनेच जाईन’ असे म्हणणारे अनेकजण आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद पडणाऱ्या एसटीमुळे हा विश्वास उडू लागला आहे. त्याला जबाबदार कोण आहे? डिझेलमुळे एसटी बंद पडल्याचेही समाज माध्यमात आले आहे. याची जबाबदारी कोण घेणार आहे की नाही. समाज माध्यमे ही आरसा आहेत. आपल्या चुका दाखवण्याचे काम ते करत आहेत. त्यातून चुका सुधारण्यास वाव असतो. आपल्या चुकीमुळे कोणाला त्रास होत असेल तर ती सुधारली पाहिजे. तुम्ही सुधारणा केलीही असेल पण त्याचा रिझल्ट अद्याप दिसलेला नाही. उलट करमाळा आगारात सर्व सुरळीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी दिलेली माहिती तुमच्याशिवाय कोणी दिली होती का? तुमचा काय करमाळ्यावर राग आहे का? यातून सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतो आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये कागदाला महत्व आहे आणि एवढा विषय होऊन जर प्रवाशांचे प्रश्न कागदावर सरकारकडे गेलेच नाही तर तो दोष कोणाचा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे संवेदनशील आहेत. ते नक्कीच याची शहानिशा करून करमाळाकराना न्याय देतील यात शंका नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांनीही यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे. विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हा प्रश्न मांडला. माजी आमदार जयवंतराव जगताप व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळ्याला नवीन एसटी बसची मागणी केली याचे पत्र माध्यमात आले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीपेक्षा लोकप्रतिनिधीनी दिलेल्या मुद्द्यांचा विचार होणे आवश्यक आहे. प्रा. रामदास झोळ यांनी हा विषय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मांडला होता. त्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी सर्व अधिकारी यांची यासाठी बैठक घेतली होती. तेव्हा पत्रकार विशाल घोलप यांनी ‘या बैठकीतून काहीही साध्य होणार नसल्या’चे स्पष्ट सांगितले होते. आगार प्रमुख होनराव यांच्या कामाची प्रचिती कदाचित तेव्हाच त्यांना आलेली असावी. आगार प्रमुख होनराव हे नेमके असे का करत आहेत? हे स्पष्ट होत नाही. वास्तव माहितीही ते का देत नाही असे विचारले जाऊ लागले आहे. होनराव साहेब आहे त्या यंत्रणेतून नागरिकांचा एसटीवर विश्वास बसण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज आहे. आपण चांगले काम करत असला तरी आता एसटीची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे हे मात्र आता निश्चित!
वास्तविकता आहे ही, मी इतर आगारांच्या एसटी बसनेही प्रवास केला आहे पण करमाळा आगारातील बसेस ची अवस्था अत्यंत दयनीय आहे.