करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून यावर्षी करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई व विहाळ हे साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे हाळगाव येथील बारामती ऍग्रो, अंबालिका, विठ्ठल शुगर या शिवाय तालुक्याच्या शेजारील कारखान्यांना करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी जात आहे. यात अंबालिका कारखान्याकडे जाणारी वाहने अतिशय धोकादायकरित्या करमाळा शहरातील संगम चौकातून जात आहेत. ही वाहतूक बाहेरून वळवणे आवश्यक आहे.
करमाळा तालुक्यातील आळजापूर, बिटरगाव श्री, पोथरे, तरटगाव, पोटेगाव, बोरगाव, करंजे, बाळेवाडी आदी गावातून तोडलेला ऊस अंबालिका कारखान्याला जात आहे. या भागातून येणारे ऊसाचे ट्रॅक्टर श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून संगम चौकातून राशीन रोडला जात आहेत. या दोन्ही ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यात ऊसाचे ट्रॅक्टर आल्यानंतर अधिकची वाहतूक कोंडी होत आहे. त्याशिवाय ऊसाने भरलेल्या ट्रॉली मागे असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
येथून येणारे उसाचे ट्रॅक्टर बायपास मार्गे मौलालीमाळ येथून उपजिल्हा रुग्णालय येथून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मार्गे राशीन रोडकडे वळवता येऊ शकतात. येथेही रस्त्यामुळे धोकादायक आहे. मात्र संगम चौकाच्या तुलनेत रहदारी कमी असते आणि तुलनेत रस्ता रुंद आहे. याकडे प्रशासनाने काही धोका होण्याच्या आधी लक्ष देण्याची गरज आहे.