करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या काही वर्षांपासून आम्ही करमाळा तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात काम करत आहे. मात्र आम्हाला काहींनी हलक्यात घेतले. करमाळ्यातही आणि मुंबईतही, असे म्हणत जगदीश अग्रवाल यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समोरच कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. जगदीश अग्रवाल, गणेश चिवटे व इतर काही मंडळीने महायुती सोडत अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा दिला आहे. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर पक्ष कारवाई केली आहे. येथे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे आहेत. भाजपने त्यांना विचारात घेतले नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. आज त्यावर स्वतः अग्रवाल हे बोलले आहेत. अग्रवाल हे भाजपचे शहराध्यक्ष होते. मात्र आता त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.
अग्रवाल म्हणाले, आमदार शिंदे यांनी तालुक्यात विकास काम केले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अटीशिवाय पाठींबा देत आहोत. आम्हाला तालुक्यात आणि मुंबईतही काहींनी हलक्यात घेतले. मात्र आमची ताकद आता दाखवणार आहोत. पूर्ण ताकद आमदार शिंदे यांच्या मागे आम्ही उभा करणार आहोत. २३ तारखेला आमची ताकद सर्वांना दिसेल, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.