करमाळा (सोलापूर) : हिसरे येथील झहीर शेख यांची मुलगी जस्मिन शेख हिची केंद्रीय गृह विभागातील वित्त व लेखा अधिकारी पदावर स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून निवड झाली आहे. या निवडीबद्दल भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने सुरज शेख, जमीर सय्यद, आझाद शेख, रमजान बेग यांच्या हस्ते जस्मीनचा सत्कार करण्यात आला. जस्मिन शेख हिचे आई- वडील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
शेख यांनी मुलीला काॅंम्प्युटर इंजिनिअर या पदवी शिक्षणापर्यंत शिकवुन त्यांना स्वावलंबी बनविले. जस्मिन शेख म्हणाल्या, मी स्वाॅप्टवेअर डिव्हलपर पदावर काम करुन स्वतः सेल्फ स्टडीच्या माध्यमातून मोबाईलवरील युट्यूब पाहुन युपीएससीचा अभ्यास केला आहे. जे यश मिळाले आहे त्यामागे जिद्द, चिकाटी आणि आई वडिलांचे कष्ट आहेत.
पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन शिक्षणासाठी खर्च करण्याची मानसिकता तयार करावी व मुलांनीसुद्धा आपल्या भविष्यासाठी आई- वडील जे कष्ट करत आहेत. त्याची चीज करुन जीवनात यशस्वी होण्यासाठी कोठेही कमी पडू नये. आई- वडीलांचे उर्वरित आयुष्य हे सुख समाधानात कसे जाईल याचे भान नेहमी आपल्या मनात व डोक्यात ठेवावे यश तुम्हाला मिळणारच याची मला खात्री आहे.
यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे समीर शेख, सकल मुस्लिम समाज करमाळाचे अध्यक्ष जमीर सय्यद, आझाद शेख, रमजान बेग, सुरज शेख, पत्रकार आलिम शेख, शाहीद बेग, दिशान कबीर, आलिम पठाण यावेळी उपस्थित होते.