करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाने आणखी एक बळी घेतला आहे. अनेक दिवसांपासून या मार्गाचे काम व्हावे, अशी मागणी आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयी झाल्याबरोबर याबाबत बैठक घेतली होती. त्यापूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर व माजी आमदार संजयमामा शिंदे यांनीही त्यांच्या काळात बैठका घेतल्या. मात्र अजूनही याचे काम मार्गी लागलेले नाही. पण अपघाताची मालिका सुरूच आहे.
या रस्त्यावर सोमवारी (ता. ३) सकाळी १० वाजताच्या सुमारास मांगीजवळ एक अपघात झाला. त्यात गणेश दादासाहेब वारे (वय ४१, रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. वारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचे चुलत बंधू होते. ते मोटरसायकलने करमाळ्याकडून अहिल्यानगरकडे (जातेगाव) जात होते. त्यांची मोटारसायकल व पीकप यांच्यात अपघात झाला. पिकअप चालक वैभव रामा तरंगे (वय २१, रा. शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेला संशयित चालक रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या वारे यांच्या मोटरसायकलला त्याने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले.