‘आदिनाथ’मध्ये अनुभवींना नोकरीची संधी! कारखाना सुरु करण्याबाबत आमदार पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ऊसतोड वाहुतक करार शुभारंभानंतर आता कारखान्यात कर्मचारी भरण्याची देखील प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत कारखान्याने प्रसिद्धीकरण केले असून अडचणीत आलेला हा कारखाना सुरु करण्यासाठी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कामाला लागले असल्याचे चित्र आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. हा कारखाना सुरु करणे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वीच या कारखान्याची निवडणूक झाली होती. त्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव करत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाला. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत आमदार पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून महेंद्र पाटील यांची निवड झाली आहे. बागल गटाच्या पाठींब्यामुळे आदिनाथ कारखाना पाटील यांच्याकडे आला. आता हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

२५०० मे. टन गाळप क्षमता असलेला आदिनाथ कारखाना आहे. हा कारखाना सुरु करण्यासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. चीफ अकाउंट, चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, मुख्य शेतकी अधिकारी, लेबर ऑफिसर व सुरक्षा अधिकारी अशी प्रत्येकी एक जागा भरायची आहे. अनुभवी व पात्र व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन प्रसिद्धीकरणाद्वारे करण्यात आले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना हा अडचणीत आहे. या कारखान्यावर बँकांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला असून हा कारखाना सुरु करण्यासाठी सर्व संचालकांच्या मदतीने प्रयत्न सुरु आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *