करमाळा (सोलापूर) : ‘समाजात काम करत असताना कोणीतरी आमच्या उणीवा सांगितल्या पाहिजेत, त्या उणीवा सांगण्याचे काम पत्रकार करत आहेत. सर्वजण होयबा म्हणाले तर आमचाही कार्यक्रम लागायला वेळ लागणार नाही. मात्र करमाळ्याचे पत्रकार सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पत्रकारिता करत आहेत ही आनंदाची बाब आहे,’ असे गौरवोद्गार आमदार संजयमामा शिंदे यांनी काढले आहेत.
पत्रकार दिनानिमित्त करमाळ्यात विठ्ठल निवास येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. डॉ. बाबूराव हिरडे हे होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, अशोक नरसाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड व सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल उपस्थित होते. पत्रकार अण्णा काळे, अशोक मुरूमकर, विशाल घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.
आमदार शिंदे म्हणाले, करमाळ्याची पत्रकारिता ही सकारात्मक आहे. राजकारण्यांच्या उणीव दाखवण्याचे काम ते करत आहेत. वास्तव मांडले जात असताना एखादी बातमी आली म्हणून समाज लगेच विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवायला आणि विश्वास एखाद्यावरील विश्वास काढण्यासाठीही समाज वेळ घेतो. त्यामुळे आपले काम सातत्याने सुरु ठेवले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज ढेरे, तुषार शिंदे, मानसिंग खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी पत्रकार अशपाक सय्यद, शंभूराजे फरतडे, जयंत दळवी, किशोर शिंदे, धनंजय मोरे, सुनील भोसले, दिनेश मडके, सिद्धार्थ वाघमारे, अलीम शेख, नाना पठाडे, दस्तगीर मुजावर, नागेश चेंडगे, अंगद भांडवलकर, धर्मराज दळवी, सचिन जेव्हरी, जयंत कोष्टी, संजय मस्कर, विशाल परदेशी आदी उपस्थित होते.