करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन विकास कामांसाठी निधीची मागणी केली आहे. सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक संजय सावंत, हुमरान मुलाणी, दादा इंदलकर, सुनील लुणिया, रवी जाधव, संदीप कांबळे, अमोल परदेशी, सिद्धेश लावंड आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, हद्दवाढीनंतर आवश्यक असलेली मूलभूत सुविधा तसेच नव्या प्रभागांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी या यावेळी करण्यात आली. करमाळा शहराचा नियोजनबद्ध व वेगवान विकास व्हावा, यासाठी सरकारस्तरावरून तातडीने सहकार्य मिळावे, अशी भूमिका सावंत गटाने स्पष्ट केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
