करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. वैशाली घोलप यांच्यासह चार व नगरसेवक पदासाठी ६८ इच्छुकांनीभाजपकडे आज (रविवार) उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या घरातील बागल गटाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा होती. मात्र त्यांच्यातील कोणीच मुलाखत दिली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत.
Video : करमाळ्यात कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढणार : कल्याणशेट्टी
भाजपकडून नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी, शशिकांत चव्हाण यांनी बागल गटाचे संपर्क कार्यालय येथे मुलाखती घेतल्या. यावेळी भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रश्मी बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, कन्हैयालाल देवी, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सचिन पिसाळ, सतीश नीळ आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. त्यासाठी भाजपकडून माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांच्या पत्नी डॉ. वैशाली घोलप, भाजपचे देवी यांच्या पत्नी सुनीता देवी, माजी नगरसेवक राहुल जगताप यांच्या पत्नी अरुंधती जगताप व सपना घोरपडे या चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. २० नगरसेवक पदासाठी १० प्रभागातून व नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे.
नगरसेवकपदासाठी माजी नगराध्यक्ष शोकात नालबंद, ऍड. भाग्यश्री मांगले शिंगाडे, माजी नगरसेविका राजश्री माने, पत्रकार सुहास घोलप, दीपक चव्हाण, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, राहुल जगताप, अतुल फंड, रितेश कटारिया, प्रवीण जाधव, सचिन घोलप, स्वाती फंड, निर्मला गायकड, सविता कांबळे यांच्यासह ६८ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.
