करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील विहिरींचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली अनेक बेकायदा कामे पुढे येऊ लागली आहेत. याबाबत प्रहारने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना निवेदन दिले आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यात रोजगार हमीच्या कामाचा अक्षरश बोजवारा उडाला असल्याचे दिसू लागले आहे. नदीच्या कडेला स्वतःच्या शेतात विहीर खोदता येत नाही, असे सांगत बिटरगाव श्री येथील एका विहिरीचे काम तांत्रिक अधिकारी यांनी बंद पाडले. मात्र याच अधिकाऱ्याने अतिक्रमणात विहीर होत असताना डोळेझाक केली आहे. त्या अधिकाऱ्यावर लाभार्थ्यांना पैसे मागितल्याचा आरोपही आहे. मात्र तरीही करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. या अधिकाऱ्याची त्वरित चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे.
राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्यात ‘विहीर कोठे खोदावे’ याचे मार्गदर्शन केले आहे. मात्र याचाच करमाळा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेतील तांत्रिक अधिकाऱ्याने चुकीचा अर्थ काढत लाभार्थ्यांची अडवणूक केली आहे. दुसरीकडे या अधिकाऱ्याने अतिक्रमणात विहिरी होत असताना डोळेझाक केली आहे. त्या अधिकाऱ्यावर अनेक लाभार्त्यानी पैसे मागितल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे त्यावर कारवाई, करावी. करमाळा तालुक्यात सर्व लाभार्थ्यांना जास्तीत जास्त विहिरी कशा मिळतील, याकडे पहाणे आवश्यक असताना अडवणूक करणाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे, असे असे प्रहारने निवेदनात म्हटले आहे.
प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी याबाबत बच्चू कडू यांनाही माहिती दिली आहे. प्रहार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहते. त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यावर होणार अन्याय सहन केला जाणार नाही. वेळ पडल्यास प्रहार रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रहारने दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के, सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख व करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्या सह्या आहेत.