करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा पोलिस ऍक्शन मोडवर आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व भयमुक्त निवडणूक व्हावी म्हणून प्रतिबंधक कारवाई सुरु केली आहे. यातूनच पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी गंभीर गुन्ह्यातील १० जणांवर तडीफार करण्याची कारवाई केली आहे. तर १००० पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
लोकशाहीमधील विधानसभा निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. या निवडणुका भयमुक्त आणि शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन काम करत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे हे वेळोवेळी योग्य त्या सूचना देत आहेत. पोलिस निरीक्षक घुगे हे देखील प्रशासनाकडून आलेल्या सूचनांची अमलबजावणी करत आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पोलिस बंदोबस्तासाठीही योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध केले जात आहे.
पोलिस निरीक्षक घुगे म्हणाले, ‘निवडणूक काळात सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये. लोकशाही मार्गाने या निवडणूक होणे आवश्यक असून त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झालेली आहे. खबरदारी म्हणून उपाययोजनाही केल्या जात आहेत. या काळात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.’