करमाळा (अशोक मुरूमकर) : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला करमाळा पोलिस ठाणे व पोलिस वसाहतीचा मार्गे अखेर मोकळा झाला आहे. ज्या ठिकाणी नवीन वसाहत व पोलिस ठाणे प्रस्तावित आहे त्या जागेची प्रशासनाकडून तपासणी सुरु आहे. इमारतीसाठी जागेचा सर्व्हे सरकारच्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितच्या वतीने नियुक्त कन्सल्टंटकडून सुरु आहे. आतापर्यंत तीन ठिकाणचे (बोअरवेलमार्फत दगड) शांपल घेण्यात आले आहेत. आणखी शांपल घेतले जाणार असून त्यानंतर अंदाजपत्रक तयार करून ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे.
करमाळा पोलिस वसाहत अनेक दिवसांपासून मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे पोलिस बांधवांची गैरसोय होत आहे. नवीन पोलिस वसाहत उभारण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. अखेर त्या मागणीला यश आले असून ज्या ठिकाणी पोलिस वसाहत उभारावी, अशी प्रस्तावित जागा आहे. त्या जागेची तपासणी सध्या सुरु झाली आहे. जमिनीत किती फुटावर खडक आहे? तो कोणत्या प्रकारचा आहे? माती कोणत्या प्रकारची आहे? त्यावर बांधकाम कसे करावे लागणार? याची तपासणी सुरु आहे. यासाठी सरकारकडून एक कन्सल्टंट नेमण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या गृह विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितच्या मार्फत पोलिस वसाहत व पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम केले जाते. करमाळ्यात नवीन पोलिस ठाणे व पोलिस वसाहत व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार आता नवीन पोलिस ठाणे व पोलिस वसाहत होणार आहे.
संबंधित एजन्सीचे सिव्हिल इंजिनिअर रोहित गोडगे म्हणाले, ‘सरकारच्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितच्या वतीने सोलापुरातील एका कंपनीला कन्सल्टंट म्हणून नियुक्त केले आहे. त्याअंतर्गत काम सुरु आहे. पोलिस वसाहत व पोलिस ठाणे इमारत असे हे काम असणार आहे. या इमारतीचे लाइनऑउट झाले आहे. मात्र पाया खोदण्यासाठी सॉईल टेस्ट सुरु आहे. काम करण्याची ही प्रक्रिया आहे. सॉईल टेस्ट झाल्यानंतर इस्टिमेट होईल त्यानंतर निविदा आणि काम अशी कायदेशीर प्रक्रिया होईल. आम्ही सर्व तपासणीचे अहवाल देणार आहोत.’
