करमाळा (अशोक मुरूमकर) : राजकारणात कोणता मुद्दा कधी उचललेला जाईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपासून करमाळ्याच्या राजकारणात एक सर चर्चेत आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात सरांचा उल्लेख केला होता. आता माजी आमदार नारायण पाटील यांनीही सरांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकारणातील ‘हे’ सर नेमके कोणते? अशी चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा तहसील कार्यालयाचे स्थलांतर करू नये यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी धरणे आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी मांडलेल्या मुद्द्याचा संदर्भ देत सरांचे मार्गदर्शन का हवे? असे सांगितले. तहसील कार्यालय स्थलांतर केले तर विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होईल हे प्राचार्य बिले यांनी सांगितले होते. हा मुद्दा माजी आमदार पाटील यांना अत्यंत प्रभावित वाटला आणि त्यांचे जाहीपणे कौतुक केले.
माजी आमदार पाटील नेमके काय म्हणाले : प्राचार्य बिले यांनी जो मुद्दा मांडला तो कोणाच्याही लक्षात आला नाही. राजकारणात शिक्षक व प्राचार्य मार्गदर्शक हवेत असे आम्हाला पूर्वीपासून वाटायचे आणि आज ते खरे झाले. ‘विद्यार्थ्यांना लागणारे दाखले काढण्यासाठी त्यांची पायपीट होणार व वेळ जाणार हा मुद्दा प्राचार्य बिले यांनी मांडला होता’. पुढे बोलताना पाटील म्हणाले, पूर्वीपासून तुम्ही ज्ञानदानाचे काम करत आला आहात. त्यामुळे या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या.
आमदार संजयमामा शिंदे हे देखील एका कार्यक्रमात कोणत्यातही सरांचे नाव न घेता बोलले होते. ते काय म्हणाले होते : ‘सरकारमध्ये काय चालले आहे. राजकीय परिस्थितीत काय आहे हे नेमके समजले पाहिजे ना? कोठे फुटाफुटी होते का? याचाही संदर्भ पाहिजे ना. कोणी तरी एखाद्या सरांनी कानात बसून काही सांगितले आणि त्यांचे ऐकून राजकारण होत असतं का?’
नेमके सर कोणते?
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आणि त्यात सर्व इच्छुकांकडून रणनीती आखली जात आहे. आपापल्या पद्धतीने दौरेही सुरु आहेत. त्यात आता करमाळ्याच्या राजकारणात सरांची एंट्री झाली आहे. करमाळ्यात अनेक दिवसांपासून विलासराव घुमरे सर यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख केला जातो. आता माजी आमदार पाटील यांनी प्राचार्य बिले यांचा संदर्भ देत शिक्षकाचे मार्गदर्शन का हवे असे सांगितले असले. तरी ते नेमके त्याच सरांबद्दल बोलले की पाटील गटात आणखी कोण सर आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. आमदार शिंदे यांनीही त्यांच्या एका भाषणात जो उल्लेख केला होता ते नेमके सर कोणते हाही चर्चेचा विषय असून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक कधी कोणता मुद्दा मांडतील हे सांगता येत नाही हेच म्हणावे लागेल.