(अशोक मुरूमकर) : गेल्या काही दिवसांपासून करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. कार्यक्रमांसाठी असलेली त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधत आहे. आज फलटण (जि. सातारा) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभेवेळीही ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या देखील मंचावर होत्या. कार्यक्रम पत्रिकेत आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचेही नाव होते.
फलटण येथे निरा देवधर प्रकल्पाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार जयकुमार गोरे, विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, शिवेंद्रसिह राजेभोसले, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, गोपीचंद पडळकर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार जगताप, मदनदादा भोसले, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे आदी उपस्थित होते.
बागल व जगताप हे एकमेकांचे विरोधक आहेत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात जगताप व बागल हे प्रमुख गट आहेत. त्या दोन्ही गटाचे ते प्रमुख नेते आहेत. जगताप यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट करून आपण ‘तालुक्याच्या राजकारणात आमदार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर तर वरच्या राजकारणात भाजपबरोबर’ असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान ‘निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांचे मिटत नसेल तर माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने मला उमेदवारी द्यावी’, असे म्हणत त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जगताप हे आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमातही दिसले आहेत.
बागल गटाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी एप्रिलमध्ये झालेल्या स्व. दिगंबरराव बागल मामा कृषी महोत्सवापासून भाजपशी जवळीक वाढवलेली आहे. मोहिते पाटील यांच्या माध्यमातून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाली तेव्हा बागल गटाची भूमिका महत्वाची होती. सध्या मकाई कारखान्यामुळे बागल अडचणीत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बागल गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे.