करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांनी आदेश देऊनही प्रा. रामदास झोळ यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने चौरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून (शरद पवार यांची राष्ट्रवादी) माजी आमदार नारायण पाटील, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व महायुतीकडून (शिवसेना शिंदे गट) दिग्विजय बागल हे निवडणूक रिंगणात आहेत. यांच्यासह १५ उमेदवार मैदानात आहेत मात्र पाटील व शिंदे यांच्यात प्रमुख लढत मानली जात असून बागल कशी कामगिरी करतील यावर बरेच अवलंबून आहे. प्रा. झोळ कोणाची मते घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १५ जण निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार नारायण पाटील, आमदार संजयमामा शिंदे, दिग्विजय बागल, प्रा. रामदास झोळ, सिध्दांत वाघमारे, ऍड. जमीर शेख, जालिंदर कांबळे, धीरज कोळेकर, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, विनोद सीतापुरे, संजय शिंदे, अशोक वाघमोडे, अभिमन्यू अवचर, संजय शिंदे हे रिंगणात आहेत.
ऐन निवडणुकीत आमदार शिंदे यांचा पाठींबा काढत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने माजी आमदार पाटील यांना पाठींबा दिला आहे. त्याचा कसा परिणाम होतो हे पहावे लागणार आहे. महायुतीचे उमेदवार बागल हे तरुण उमेदवार आहेत. त्याचा बागल गट हा करमाळ्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक आहे. २०१४ व २०१९ मध्ये त्यांच्या बहीण रश्मी बागल या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र त्यांचा त्यात पराभव झाला होता. आता महायुतीकडून बागल निवडणूक रिंगणात आहेत. गट टिकविण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून पूर्ण ताकदीने ते या निवडणुकीत उतरले आहेत. काही दिवसांपासून गटापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना ते पुन्हा गटात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला किती यश येते हे पहावे लागणार आहे.
प्रा. झोळ यांनी साधारण दीडर्षापासून करमाळ्यात जोरदार काम सुरु केले. मकाई व आदिनाथ कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलने केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना मतदार कसा साथ देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली आहे. येथे पाटील व शिंदे यांची प्रमुख लढत मानली जात असून बागल व झोळ यांच्या कामगिरीवर विजय अवलंबून असणार असल्याचे बोलले जात आहे.