करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. त्यात ‘भूमिपुत्र’ हा मुद्दा चर्चिला जाऊ लागला असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील यांनी थेट सभेतच भूमिपुत्राला निवडून द्या, असे विधान केले. त्याला आरपीआयचे नागेश कांबळे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ३६ व करमाळा तालुक्यातील ११८ गावे आहेत. आमदार संजयमामा शिंदे हे माढा तालुक्यातील ३६ गावातील आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील आहेत. करमाळा तालुक्यातील मतविभागणीचा फटका बसून आमदार संजयमामा शिंदे यांचा विजय सोपा असल्याचे बोलले जाते. त्यावरून आता पुन्हा ‘भूमीपुत्रा’चा मुद्दा काढून भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न शिंदे विरोधकांकडून केला जात आहे. मात्र त्याला आता करमाळ्यातूनही उत्तर दिले जाऊ लागले आहे.
शितलादेवी मोहिते पाटील यांनी जातेगाव येथील सभेत ‘करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना विजयी करा, असे आवाहन करताना भूमिपुत्र हा शब्द वापरला होता.’ त्यावर आज (गुरुवारी) नागेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. नागेश कांबळे यांनी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्याच पत्रकार परिषदेत कांबळे यांना माध्यम प्रतिनिधीने केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘माढा तालुक्यातील ३६ गावे ही करमाळा मतदारसंघातील आहेत. देशातील प्रत्येक नागरिक हा भूमीपुत्रच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मतदारसंघात निवडणूक लढवली. भूमिपुत्र हा शब्द वापरणे योग्य नाही. भूमिपुत्र म्हणून मतदारसंघाची विभागणी करणे बरोबर नाही. माढा व करमाळा हा तालुका सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. याची विभागणी कशी केली जाऊ शकते? हा प्रश्न म्हणजे भ्रमनिराश करणारा आहे’, असे म्हणत त्यांनी उत्तर दिले आहे.