करमाळा (अशोक मुरूमकर) : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात कर्मचारी सहभागी झाल्याने करमाळा तहसील परिसरात आज (गुरुवारी) शुकशुकाट दिसत होता. एकाही कार्यालयात कर्मचारी नव्हते. फक्त रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात अभियांत संघटनाचे कर्मचारी यांनी पाठींबा देऊन काळ्या फिती लावून कामकाज केले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनी पुकारलेल्या बेमुदत संपात करमाळ्यातील तहसील कार्यालय, दुय्यम नोंदणी कार्याल, पंचायत समिती व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
करमाळा तहसील कार्यालय येथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन योजना लागू करा आशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्व संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते. अभियांत संघटनाचे कर्मचारी यांनी पाठींबा देऊन काळ्या फिती लावून कामकाज केले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ रणसिंग म्हणाले, ‘वरिष्ठांच्या आदेशाने संघटना या बेमुदत संपात सहभागी झाली आहे. दिवसभर काळी फित लावून काम केले आहे.’ तर जिल्हा परिषद उपविभाग कार्यालयात इतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले होते.
करमाळा तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व भूमी अभिलेख कार्यालयात कोणीही कर्मचारी नव्हते. काही ठिकाणी नागरिकांची निवेदने व माहिती देण्यासाठी एक- एक कर्मचारी असल्याचे दिसले. कोणीच कर्मचारी कामावर नसल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. बेमुदत संप असल्याची माहिती सर्वत्र झाल्यानंतर मात्र दुपारून परिसरात नागरिक दिसले नाहीत.