Photo : सेवेची परंपरा, वारकरी भारावला! करमाळकरांकडून श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीला जड अंतःकरणाने निरोप

करमाळा (अशोक मुरूमकर) : निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेट देशील पांडुरंगा । श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज (सोमवारी) सकाळी करमाळा शहरात भव्य स्वागत झाले. वाजत गाजत भाविकांनी खांद्यावर पालखी सुभाष चौकात आणली. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. मेन रोड, राशीन पेट व दत्त पेठेतही लांबपर्यंत भाविक होते. पालखी सोहळ्याचे यजमान राशीन पेठ तरुण सेवा मंडळाने वारकऱ्यांचे विविध प्रकारचे आधारातीथ्य केले. त्यानंतर भक्तांनी दत्त मंदिरापर्यंत पालखी खांद्यावर नेहत जड अंतःकरणाने निरोप दिला.

रावगाव येथील मुक्काम झाल्यानंतर सोमवारी सकाळी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रसन्न वातावरणात ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा जयघोष करत करमाळ्यात आला. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी येथे गर्दी केली होती. वारकऱ्यांचे जेवण झाल्यानंतर सुभाष चौकातून पुढे पंढरीच्या दिशेने जेऊर येथील मुक्कामासाठी दुपारी १२.१५ वाजता पालखी मार्गस्थ झाली.

करमाळ्यात वारकऱ्यांसाठी करमाळ्यात मोफत पाणी बॉटल, चहा, नाश्ता, पावसापासून बचाव करणारे कागद वाटप झाले. स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी कर्मचारी नियुक्त केले होते. काही क्षणातच संपुर्ण पालखी मार्ग स्वच्छ झाला. अनेक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी खोकी ठेवली होती. त्यात वारकऱ्यांनी मोकळ्या बॉटल, चहाचे कागदी कप टाकले.

राशीन पेठ व मेन रोडवर दुतर्फा वारकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यानंतर काहीवेळ तेथेच वारकऱ्यांनी विश्रांती घेत गप्पागोष्टी केल्या. पालखी मार्गस्थ होताच पुढे नगारा त्यानंतर भगवा पताका खांद्यावर घेतलेले वारकरी व त्यामागे डोक्यावर तुळस असलेल्या महिला वारकरी दिंड्याच्या माध्यमातून टाळ- मृदूंगाचा जयघोष करत होते.

आषाढी एकादशीनिमित्त करमाळामार्गे दरवर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी जातात. या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी करमाळवासीय नेहमी सज्ज असतात. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना नागरिक वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत असल्याचे चित्र आहे. मोफत चहा, पिण्याचे पाणी, नाश्ता देत आहेत. पालखी मार्गावर करमाळ्यातील डॉक्टर देखील मोफत सेवा देत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत गोळ्या औषधे दिली जात आहेत. मानाची पालखी असलेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांना प्रशासन सुविधा देते. मात्र धुळे, जळगाव, अहिल्यानगर, बीड भागातून येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा भाविक भक्तिभावाने करत आहेत. यामुळे वारकरीही भारावून जात आहेत.

सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या दिंडीतील वारकऱ्यांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर धरलेला लेझीमचा डाव.

डोक्यावर तुळस घेऊन मोठ्या आपुलकेने एकमेकींची विचारपूस करत असलेल्या महिला वारकरी.

वारकऱ्यांना सेवा देऊन स्वतः महाप्रसादाचा आस्वाद घेताना स्वयंसेवक.

फोटो एक घटना वेगवेगळ्या

१) मोबाईलमध्ये फेटा व्यवस्थित आहे का पहाताना वारकरी २) शेजारी वीणा व्यवस्थित करताना तरुण वारकरी ३) फोटो काढत असताना कुतुहुलाने पहाताना महिला वारकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *