करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या केम ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होण्याच्या शक्यता आहे. यामध्ये मोहिते पाटील व पाटील गटाचे समर्थक अजित तळेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला आव्हान देण्यासाठी बागल गटाचे अच्च्युत पाटील, शिंदे गटाचे मारुती पारके, जगताप गटाचे सागर दौड व प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर हे एकत्र आले आहेत.
केम ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य आहेत. ६ प्रभागात १ सरपंच व १७ सदस्यांसाठी येथे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. अर्ज दाखल करण्याच्या आज (शुक्रवारी) शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी दोन व सदस्यपदासाठी ४५ अर्ज दाखल झाले आहेत. केम ग्रामपंचातीवर अजित तळेकर यांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे हे गाव आहे. तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या केमच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केममध्ये मोहिते पाटील व पाटील गटाचे समर्थक अजित तळेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये सरपंचपदासाठी सारिका कोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर बागल, जगताप, शिंदे व प्रहार पुरस्कृत पॅनलच्या मीनाक्षी देवकर या उमेदवार आहेत. या निवडणुकीत निकाल काय असेल हे अद्याप स्पष्ट नसले तरी ही निवडणूक लक्षवेधी असेल हे निश्चित आहे. सरपंचपदासाठी येथे ओबीसी महिला आरक्षण आहे. गेल्या निवडणुकीतही अजित तळेकर यांना रोखण्यासाठी सर्व गट एकत्र आले होते. यावेळी त्याचा काय परिणाम होणार का? हे पहावे लागणार आहे. एससी आरक्षणात आकाश भोसले हे विजयी झाले होते. त्यांचा साधणार ११५० मतांनी विजय झाला होता. यावेळी त्याचा काय परिणाम होणार का? हे पहावे लागणार आहे.