करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेच्या शाळेत दरवर्षी घटणारी पटसंख्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरला आहे. त्यातच या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावेत यासाठी कुगाव ग्रामपंचायतने पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच सुवर्णा पोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावरही चर्चा झाली.
कुगाव ग्रामपंचायतीची सभा नुकतीच झाली. पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शालेय साहित्य वाटप करण्यावर यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच घटत असलेली विद्यार्थी संख्या या गोष्टी विचारात घेऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला. सरपंच पोरे यांच्याबरोबरच उपसरपंच विजया गावडे, ग्रामपंचायत सदस्य मन्सूर सय्यद, कोमल अवघडे, अमृता कोकरे, सखुबाई अवघडे, मंगेश बोंद्रे, कौशल्या कामटे, प्रकाश डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत बारकुंड, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव बल्लाळ यावेळी उपस्थित होते.
सरपंच पोरे म्हणाल्या, गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विविध विकासकामांबरोबरच भावी पिढी सुदृढ कणखर करण्यासाठी काही उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यांची सुरुवात आम्ही या उपक्रमाने करत आहोत. सर्व ग्रामस्थांची त्यासाठी साथ आहे. आमदार नारायण पाटील, आदिनाथ कारखाना संचालक महादेव पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.