करमाळा (अशोक मुरूमकर) : कुकडी उजनी उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याने करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावागावात या निर्णयाचे स्वागत सुरु असून फटाके फोडून जल्लोष केला जात आहे. वीटनंतर लिंबेवाडी येथे आज (बुधवारी) या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असल्याचे सरपंच किरण फुंदे यांनी सांगितले आहे.
कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाला सरकारकडून आदेश येताच आमदार शिंदे समर्थकांकडून जल्लोष सुरु झाला आहे. आमदार शिंदे यांनी २०२२ पासून केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळाले असल्याची भावना यावेळी फुंदे यांनी व्यक्त केली. यावेळी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या योजनेमुळे तालुक्यातील ४० गावांना पाणी मिळणार आहे. या योजनेचे जनक आमदार शिंदे यांच्या या मागणीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडवणीस व पवार यांनी दिले आहेत. जलसंपदाचे सचिव डॉ. अरुण बेलसरे व महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना सर्वेक्षणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेशही यावेळी दिले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचेही फटाके वाजवून लाडु वाटून स्वागत करण्यात आले आहे.