शेवटच्याक्षणी संजयमामांचा फोन! चौघांशी सवांद आणि ऍड. विघ्नेंच्या ‘गळ्यात माळ’, सरपंच ते उपसभापती कसा झाला प्रवास?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे सभापती म्हणून भाजपच्या पूजा ढेरे आणि उपसभापती म्हणून ऍड. अजित विघ्ने यांची आज (गुरुवार) निवड झाली. भाजप व राष्ट्रवादी (बागल व संजयमामा शिंदे) हे या निवडणुकीत एकत्रित उतरले होते. त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही पाठींबा दिला होता. सभापती पद हे ढेरे यांना जाणार हे निकाल जाहीर झाल्यापासूनच निश्चित होते. मात्र उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि शेवटी माजी आमदार शिंदे यांनी धक्कातंत्र वापरत ऍड. विघ्ने यांना संधी दिली. गावचा सरपंच ते उपसभापती असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. ‘काय सांगता’शी विशेष संवाद साधत या निवडीचे श्रेय ऍड. विघ्ने यांनी माजी आमदार शिंदे यांना दिले आहे.
करमाळ्याच्या सभापतीपदी ढेरे बिनविरोध तर उपसभापतीपदाची ऍड. विघ्ने यांना पुन्हा लॉटरी

करमाळा पंचायत समितीत १२ सदस्य आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे (अजित दादा) चार, बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे चार व आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीचे चार सदस्य आहेत. ऍड. विघ्ने यांनी शिंदे गटाची प्रवक्ता म्हणून खिंड लढवली. शिंदे गटावर झालेला प्रत्येक राजकीय वार त्यांनी झेलला आणि त्यांना जशाच तसे उत्तर दिले.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते म्हणून काम पाहताना ऍड. विघ्ने यांनी कशाचाही विचार केला नाही. अखंड शिवसेनेतुन त्यांनी राजकीय सुरुवात केली. केत्तूरचे सरपंच म्हणूनही ऍड. विघ्ने यांनी काम पाहिले होते. निवडीनंतर बोलताना ऍड. विघ्ने म्हणाले, ‘संजयमामा शिंदे यांनी खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी दिली आहे. त्यातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्याला कायम प्राधान्य राहणार आहे. सुरुवातीपासून नागरिकांची कामे करण्यासाठी मी प्राधान्य दिले आहे. काम करण्यासाठी तालुक्यातील कोणत्याही नेतृत्वाने संधी द्यावी, असे कायम वाटायचे आणि ती संधी नेते संजयमामा शिंदे यांनी दिली.’

पुढे बोलताना ऍड. विघ्ने म्हणाले, ‘संजयमामा शिंदे यांनी योग्यवेळी काम करण्यासाठी मोठी संधी दिली आहे. माझ्यावर त्यांनी विश्वासपूर्ण जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काम करणार आहे. निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी (बागल व शिंदे) एकत्रित लढले. त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही पाठींबा दिला. त्यामुळे त्यांचा समन्वय ठेवून काम करत राहणार आहे’

‘माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा एक शिलेदार म्हणून येणाऱ्या काळात काम करत राहणार आहे. पहिल्यापासून काम करण्याची मला आवड आहे. सरपंच म्हणूनही मी काम पाहिलेले आहे. शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून राजकीय लढाई सुरु केली होती. गावात आमचे एकटे घर आहे. गावकऱ्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे. सर्वसामान्य नागरिक कायम माझ्याबरोबर राहिला. त्यामुळे विजयी झालो. करमाळा तालुक्यात संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. हे यावरून दिसत आहे. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार’, असल्याचे ऍड. विघ्ने यांनी सांगितले.

सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड होती. सुरुवातीपासून उपसभापती म्हणून भारत अवताडे किंवा चंद्रकांत सरडे यांच्या पत्नी वनमाला सरडे यांचे नाव आघाडीवर होते. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही मिनिट राहिले असताना ऍड. विघ्ने यांचे नाव फायनल झाले असल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन ऍड. विघ्ने यांचे नाव फायनल झाले, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *