करमाळा (सोलापूर) : वडशिवणे तलावात उजनीचे कायमस्वरूपी पाणी सोडून या भागाचा विकास करण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केले.
करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ यांच्या प्रचारार्थ केम येथे सभा झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष आजिनाथ परबत, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, आदिनाथचे माजी संचालक माजी संचालक लालासाहेब जगताप, श्रीकांत साखरे, वाशिंबेचे माजी सरपंच अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे, गजेंद्र भोसले, एकनाथ शिंदे, हनुमंत जगताप, गफूर शेख, आनंद झोळ, प्रशांत बागल, युवराज तळेकर आदी उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, ‘केम परिसरातील शेती वडशिवणे तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या तलावाचा फायदा सातोली, मलवडी, केम, पाथुर्डी गावांना होत होता. परंतु तलावात बारमाही पाणी नसल्यामुळे त्याचा फटका या परिसरातील शेतीला बसलेला आहे. या तलावात कायमस्वरूपी उजनीचे पाणी यावे, ही या परिसरातील शेतकऱ्यांची बरेच दिवसांची म्हणजेच उजनी धरण झाल्यापासून मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण संधी दिल्यास लढा देऊन उजनीमध्ये बारमाही पाणी आणण्यासाठी काम करणार असल्याचे यांनी सांगितले.
‘मराठा, धनगर, ओबीसी, बहुजन समाजाला आपण शैक्षणिक समानतेच्या धोरणावर सवलती मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ निवडून द्या’, असे आवाहन प्रा. झोळ यांनी केले आहे. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील पुढारी सोयीचे राजकारण करत आहेत. त्यांना तुमच्या मुला बाळाची चिंता नाही. पण त्यांना भीती आहे की, हे शिकले तर आपल्या मागे कोण येणार? त्यामुळे कै. नामदेवराव जगताप यांच्यानंतर एकही शैक्षणिक संस्था कुठल्या लोकप्रतिनिधीने उभी केली नाही. त्यामुळे आता गट तटाचे राजकारणात भावनिक बोलण्याला बळी पडू नका. ज्यांनी आपल्या तालुक्याचे वाटोळे केले त्यांना आता त्यांची जागा दाखवून करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती करण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक नेतृत्व असणाऱ्या प्रा. झोळ यांना विजयी करा.’