ज्या अकलूजकरांनी दोन कारखाने विकले त्यांच्याच नेतृत्वाखाली तुम्ही आदिनाथची निवडणूक लढत आहात : शिंदेंचा पाटील यांना प्रश्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘ज्या अकलूजकरांनी स्वतःचे दोन साखर कारखाने विकले त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहात आणि लोकांना मी कारखाना विकला असे भासवत आहात. अशी किती दिवस सामान्य मतदारांची दिशाभूल करणार आहात?’ असा खोचक प्रश्न माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार नारायण पाटील यांना केला आहे.

महायुती आदिनाथ बचाव पॅनलची केम येथे प्रचार सभा झाली. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल तर आमदार पाटील यांच्या नेतृत्वखाली आदिनाथ संजीवनी पॅनल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली देखील तिसरा पॅनल आहे. यामध्ये माजी आमदार शिंदे व आमदार पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘मी कारखाना विकला असा माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी खरी माहिती घ्यावी. खोटं सांगून मतदारांची दिशाभूल करू नये. तुम्ही ज्या अकलूजकरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहात. त्यांनी त्यांचे दोन कारखाने विकले आहेत. त्यांनी किती पतसंस्था काढल्या आणि आता त्याचे काय झाले. त्यांना तुम्ही कधी प्रश्न केले का? केवळ राजकारणासाठी तुम्ही खोटे आरोप करत आहात.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्याचा मी सभासद आहे. माझी जमीन याच तालुक्यात आहे. मी कारखाना चांगला चालवेल असा विश्वास सभासदांना आहे. तुम्ही फक्त राजकारण करत कारखान्याचे नुकसान केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी तुम्हाला कारखाना सुरु करण्यासाठी मदत केली. तरीही तुम्हाला हा कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही. तुम्ही नेहमी कारखान्यात फक्त राजकारण करत आला आहात. तुमच्या या अपप्रचाराला आता मतदार बळी पडणार नाहीत’, असा टोलाही शिंदे यांनी पाटील यांना लगावला आहे.

‘मी आमदार असताना करमाळा मतदारसंघाचा विकास केला. तुम्ही अधिवेशनात एकरूपयाही आणू शकला नाहीत. आम्ही आणलेल्या विकासकामात गैरव्यहावर केला जात आहे,’ असा आरोपही शिंदे यांनी पाटील यांच्यावर केला आहे. ‘आदिनाथ कारखानाही आमचीही अस्मिता आहे. काहीही झाले तरी या कारखान्याचे आम्ही नुकसान होऊ देणार नाही. कारखाना सुरळीत करण्यासाठी मी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. या तालुक्याचा मी आमदार होतो. त्यामुळे कोण कारखाना चांगला चालवेल हे नागरिकांना समजत आहे’, असेही शिंदे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *